या वर्षीचा गणेशोत्सव आजपासून सुरु झाला. दुष्काळ आणि स्वाईन फ्लूच्या सावटाखाली या वर्षी म्हणावा तसा उत्साह कुणालाच नाही. महागाई वाढते आहे. मध्यमवर्गी आपल्याला त्याचे चटके जाणवत नाहीत, कदाचित जाणवणारही नाहीत. ज्यांची शेते करपून गेली त्यांचे दु:ख आपण कधी समजूनही घेउ शकणार नाही. शेतकरी आत्महत्या करतात आणि आपण कोरडी भाकड चर्चा करीत रहातो. गणपतीच्या पहिल्याच दिवशी खरं तरं असं नको लिहायला, पण आपलं लिहिणं आपल्या हाती असतच असं नाही …
नक्षलवादी कसे तयार होत असतील? चांगले शिकले सवरलेले लोक डॉक्टर, इंजिनियर सुध्दा नक्षलवादी होतात. आपल्या काहीच न होण्यापेक्षा त्यांच नक्षलवादी होणं चांगलच नाही का? व्ही पी सिंग काही वर्षांपूर्वी म्हणाले होते की त्यांना नक्षलवादी व्हावस वाटत, विनोबाही म्हणाले होते की त्यांची जीवनावर श्रध्दा नसती तर ते नक्षलवादी झाले असते.
भांडवलशाही की समाजवाद? की प्रत्येकाने चांगला माणूस व्हायचा प्रयत्न करीत रहाणं अधिक चांगल? पण प्रत्येकजण असा प्रयत्न करीत नाही, तो म्हणतो, की दुस-याला करु दे प्रयत्न … त्यांच्या प्रयत्नाने रानवाटेचा महामार्ग झाला की मी आलोच त्यावर माझी गाडी घेउन. मग घाउकपणे समाज बदलायला भांडवलशाही आणि समाजवाद येतात. जो तो ज्याची त्याची पोळी भाजून घेतो, कुणाची भोगाची पोळी, कुणाची वैचारिक, कुणाची अध्यात्मिक.
कुणीस म्हटल होतं की संतांची ग्रंथसंपदा म्हणजे त्यांची मृत्यूपत्र … आयुष्यभर त्यांनी जे सांगितलं ते समाजाने ऐकल नाही, म्हणून मग भविष्यात तरी कुणी ऐकेल या हेतूने त्यांनी लिहिलं … शतकं उलटली … संतांना समाजाने शस्त्र बनविलं … हा आमचा, तो तुमचा … आमचा तोच खरा .. तुमचा भामटा …
गणपती बाप्पा, असा सगळा घोळ होउन बसला आहे, जगात नाही हो, मनातच माझ्या. संत मनाच्या गुंत्याचा शेला गुंफतात … माझा सगळाच चुथडा.
उत्तम सुरवात तुम्हाला शुभेच्छा. एक मित्रत्वाच्या नात्याने सूचना. तुमच्या ब्लॉगवर तुमची मते, तुम्हाला काय वाटते ते लिहा. दुसर्यांच्या कविता, लेख टाकण्याचा मोह टाळा. कारण हा ब्लॉग तुमचा आहे.