ज्या क्षणी जे महत्वाचं वाटतं ते सर्वकालिनदृष्ट्या महत्वाचं असतंच असं नाही, बहुदा नसतच. सर्वकालिनदृष्ट्या जे महत्वाचं असतं ते दरवेळी वाटतच असं नाही. मन नावाचा जो गुंता घेउन आपण जगात वावरत असतो तो मोठा विचित्र आहे. मन निर्विकल्प कसं बनविता येइल? निर्विकल्प मन कदाचित सर्वकालिनदृष्ट्या महत्वाच्या गोष्टींकडे सतत लक्ष राखू शकेल. आपल्या मनात नाना आकांक्षा, नाना स्वप्न, झालंच तर राग, द्वेष, आकस, इर्षा, मोहाची वारुळं … बापरे एका मनात किती?
एखादं झाड लावताना जो आनंद मिळतो त्याला निर्विकल्प म्हणावं का? माती खणताना, खत घालताना, झाड खड्डयात रोवताना, एका सुंदर निर्मितीमध्ये आपण मग्न आहोत अशी विलक्षण आनंददायी भावना मनात येत रहाते. त्या झाडाचं रुजणं पाहताना, नवं पान एक एक करुन फुटताना सृजनाचा एक उत्सव चालल्यासारखा असतो.
शेतक-याचं जगणं किती समृध्द असेल? मातीतून सृजनाचे सोहळे निर्माण करताना … पण मग शेतकरी आत्महत्या का करतात? आम्ही समाजमान्य केलेलं भोगविलासी जीवन हेच खरं सुख असं मानून त्या मृगजळापाठी धावून हे सृजनाचे सोहळे तो विसरला असेल का?
हरितक्रांतीला प्रचंड मोठी उपलब्धी म्हणतात पण ती एका अर्थी शेतक-याच्या समृध्द जीवनाची रासायनिक नासाडी करणारी, त्याचं जीवन प्रदुषित करणारी घटना होती असही म्हणता येईल का? माती जी माता होती तिला कामकरी करुन जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचं साधनं म्हणून वापरणं ही मोठी सामाजिक चुक होती का?
आयुष्याचा तोल ढळला की सगळचं ढासळत … आपल्या आयुष्याचा तोल सांभाळला जातोय की आपण तीव्र उतारावरुन गडगडत चाललो आहोत, आणि या वेगालाच प्रगती मानतो आहोत?
Man ha phar gahan vishay aahe te janane pharch kathin gosth aahe.matra swa-sanwad,atmnirikshan kelyane aaple vicharat pharak padto he nakki.