प्रिय,
हे पत्र केवळ आमच्या कुमारपर्वतम्च्या यशस्वी चढाईचा वृत्तांत म्हणून. मागच्या आठवडयातच ‘सोमवारी मतदानानिमित्त सर्व कंपन्यांना सुटी आहे’ अशी खबर वाऱ्यावर उडत आली. थोडया चौकशीनंतर बातमीमध्ये तथ्यांश असल्याचे समजले. तीन दिवसांची मोठी सुटी बंगलोरमध्ये काढण्याची कल्पना मला सहन होईना! म्हणून मी आमच्या मराठी ग्रुपला ‘चला गोवा किंवा केरळला’ असे शांपण्विक पत्र (इमेल) पाठविले.
उत्साही मंडळींनी तत्परतेने उत्तरे पाठविली आणि इमेलची देवाणघेवाण जोराने सुरु झाली. शेवटी या गोंधळावर पडदा टाकण्यासाठी अनिलने संध्याकाळी घरी सहलीसंबंधी निर्णय घण्यासाठी बैठक बोलाविली. ती कल्पना सर्वांनी उचलून धरली.
संध्याकाळी सुमारे सात वाजता सर्वजण श्रीधर, मी, उपेंद्र, आदित्य, कमलेश, दिलिप, समीर, धनंजय सगळे जमले. बऱ्याच वादावादीनंतर कुमारपर्वतम्वर स्वारी करायची अनिलची कल्पना सर्वानुमते मंजूर करण्यात आली. (अनिलला ट्रेकिंगचा थोडाफार अनुभव असल्याने चमूची म्होरक्येगिरी सहाजिकच त्याच्याकडे आली.) एकदा ठिकाण निश्चित झाल्यावर पूर्वतयारी सुरु झाली. बरोबर घ्यायच्या सामानाची यादी करण्यात आली, आणि त्याच्या जमवाजमवीची जबाबदारी सर्वांमध्ये वाटण्यात आली. एव्हाना आदित्य आणि कमलेशने वैयक्तिक कारणासाठी या मोहिमेतून माघार घेतली आणि आम्ही सातजण उरलो.
अनिल आणि उपेंद्र रात्रीच ‘इंदिरानगर’मध्ये एका मित्राकडे कुमारपर्वतासंबंधी माहिती काढण्याकरिता गेले. ते रात्री उशीरा परत आले. त्यांना फारशी माहिती जमा करता आली नाही. पण कुमारपर्वताकडे जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसची चौकशी मात्र ते करुन आले. अशाप्रकारे बुधवारी रात्री कुणालाच कसे जाणार याची काहीच कल्पना नव्हती.
गुरुवारचा दिवस कुमारपर्वताची माहिती काढण्यात गेला. श्रीधराच्या एका मित्राने पुर्वी ही सफर पूर्ण केली होती. त्याच्या होमपेजवर त्याने संपूर्ण प्रवासाची व्यवस्थित माहिती टाकली होती. ती आम्हाला फार उपयुक्त ठरली. दरम्यान ग्रुपमध्ये विजयकिरण सामिल झाला. असे आम्ही आठजण झालो.
गुरुवारी संध्याकाळी मी आणि दिलिपने खाद्यपदार्थ, प्रथमोचार सामग्री, इतर सामान अशी बरीच खरेदी केली. प्रवासाअंती आम्ही खाद्यपदार्थांची बरीच नासाडी केली असे आढळून आले. पण अनुभवाअभावी आम्ही भरमसाट सामान घेतले खरे!
अनिल, श्रीधरने प्लास्टिकचे तंबू, झोपायला रबरी मॅटस् आणि सॅक या गोष्टी भाडयाने आणल्या. रास्त भाडययावर या सर्व गोष्टी येथे उपलब्ध झाल्या. त्यातली सॅक तर मला आणि अनिलला फारच आवडली. आणि आम्ही ती विकतही घेणार आहोत.
शुक्रवारी सारे कंपनीतून लवकर घरी परतले, आणि सामानाची बांधाबांध सुरु झाली. उपेंद्रने कॅमेरा बरोबर घेतला. सर्व सामान बांधून झाल्यावर सॅक फार जड झाल्या. सॅकच वजन करुन घ्यायचं राहून गेल, पण किमान 10-12 किलो वजन तरी प्रत्यकी निश्चित झाल होत. सुखसागरमध्ये थोडस खाऊन रात्री 8.00 वाजता आम्ही मॅजेस्टिक बसस्थानकाकडे कूच केले. रात्री 9.45 ची बस होती. सुमारे 8.30 वाजता बसस्थानकावर येऊन पोहोचलो. बसस्थानकावर यायची ही पहिलीच वेळ होती. स्थानक बरच स्वच्छ आणि नीटनेटक वाटल.
बरोबर 9.45 वाजता बसने बंगलोर सोडल. बसची आसने फारशी आरामदायी नसल्याने कुणालाच व्यवस्थित झोप घेता आली नाही. बस म्हैसूरवरुन गेली. हा थोडासा लांबचा मार्ग आहे. पहाटे 5.15 वाजता आम्ही सोमवारपेट नावाच्या गावी येऊन दाखल झालो.
कुमारपर्वतम्च्या पायथ्याशी वसलेले हे एक टुमदार गाव आहे. कुमारपर्वतम्चे शिखर धुक्याने वेढून गेलं होत. तिथपर्यंत जायच्या कल्पनेने मला स्फुरण चढल. कुमरापर्वतम्ची उंची 1780 मीटर आहे. स्थानकासमोरच्या एका छोटयाशा हॉटेलमध्ये थोडं खाऊन, चहा पिऊन आम्ही खाजगी बसची वाट पाहू लागलो. ही खाजगी बस आम्हाला पुष्पगिरी या ठिकाणापर्यंत नेऊन सोडणार होती. ते ठिकाण सोमवारपेटपासून 30 किमी अंतरावर आहे. तेवढयात बंगलोरचा आणखी एक ग्रुप कुमारपर्वतावर निघाला आहे असे आम्हाला दिसले. या ग्रुपमध्ये तीन मुली, एक फिरंगी आणि काही देशी मुल होती.
खाजगी मिनीबस आली, आणि आम्ही जवळजवळ 20-25 जण त्यात कोंबून बसलो. सामान टपावर टाकण्यात आल. आता बसमध्ये मुंगीलाही शिरायला वाव नाही अशी आम्हा सर्वांची खात्री होती. पण पुढच्याच ष्टापवर 5-6 जणांना बसमध्ये कोंबून ड्रायव्हरने आमच्या खात्रीला सुरुंग लावला. उत्तरोत्तर माणसं बसमध्ये भरतच गेली. शेवटी आमच्यापैकी काही वीर थाटात बसच्या टपावर बसायला गेले. नंतर काही शालेय विद्यार्थ्यांनी तोच मार्ग अवलंबला. बालवाडीत जाणारी मुलही अशा ओव्हरफ्लो बसमधून प्रवास करताना पाहून खरच फार वाईट वाटल. त्यांची शाळा मात्र झकास होती. आजूबाजूला निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केली होती. हिरवीगार झाड ………. उंचच उंच आणि वळणावळणांचा छोटासा रस्ता! शेवटी एका ठिकाणी बसचा शेवटचा थांबा आला आणि आम्ही सारे पायउतार झालो.
सामान पाठीवर घेताच उरात थोडी धाकधुक झाली. या सॅकला पोटावर बांधण्यासाठी एक पट्टा आहे. त्यामुळे खांद्यावरच्या ओझ्याला थोडा पोटभार लागतो. आरंभशूराच्या उत्साहात भराभर पावले टाकीत आम्ही चढण चढू लागलो. श्रीधर आणि अनिल गटाचं नेतृत्व करीत होतो. तंबूचे ओझे त्यांनीच संभाळले होते. एव्हाना सकाळचे 9.00 वाजले होते.
थोडयाच वेळात हिरवीगार शेते लागली. दोन-चार घरांचा एक पाडा होता. श्रीधरने तेथे वाट विचारली. श्रीधर आणि विजयकिरण दोघांनाही कानडी येते. त्यामुळे ते आमचे ट्रान्सलेटर बनले. अर्ध्यापाऊण तासात आम्ही एका मंदिरापाशी पोहोचलो. हे मंदिर केवळ अप्रतिम आहे. झाडांच्या मध्ये छोटसं मंदिर, बाजुला एक शेडवजा धर्मशाळा, आणि पुजाऱ्यासाठी एक खोली. जवळच पाण्याचे झरे होते. थंडगार आणि मधुर पाणि अमृतासारखं लागत होत. भरपूर पाणि पिऊन, थोडी बिस्किट खातोय तोच पुजारीबुवांनी आरतीसाठी बोलावल. कानडीमध्ये काहीतरी पुटपुटत घंटानाद सुरु होता. काही कळत नसल तरी खुप मंगलमय, पवित्र वाटत होत. खुप छान वाटल. तीर्थ घेऊन आम्ही परत मार्गस्थ झालो.
सुमारे तासाभराच्या चढाईनंतर आम्ही एका पाण्याच्या प्रवाहापाशी पोहोचलो. वाटेवरला हा पाण्याचा शेवटचा स्रोत आहे अस आम्हाला सांगण्यात आल होत. म्हणून तिथे थांबून हातपाय धुतले आणि जेवून घेतल (पाव, चटणी, सॉस). पाण्याची खळखळ त्या हिरव्यागार पार्श्वभूमीवर स्वर्गीय संगीत निर्माण करीत होती. खरच आपण रोजच्या जीवनात निसर्गाला किती मुकत असतो याची पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणीव झाली.
थोडी विश्रांती घेऊन पुढचा प्रवास सुरु केला. आता घनदाट जंगलाला सुरवात झाली होती. एव्हाना दुपारचा दिड वाजला होता. वाट चढणीची होती. काठीचा वापर करीत आम्ही चढत होतो. थोडयाच वेळात उत्साही मंडळी पुढे गेली, आणि मी, उपेंद्र आणि दिलिप मागे पडलो. चालता चालता 3.00 वाजले. जंगल संपायच नाव नव्हत. उलट अधिकच घनदाट होत होत. रातकिडयांची किरकिर वातावरणाच्या भीषणतेत भर घालीत होती. थोडी थोडी भिती वाटू लागली. पुढे गेलेली मंडळी फार पुढे निघून गेली होते. सतत चढणीच्या रस्त्यामुळे प्रचंड दमछाक होत होती. आणि जंगल तर संपत नव्हत.
मधेच दिलिपचा पाय चमकला! तसेच हळूहळू पुढे आगेकुच करीत निघालो. जंगल संपल आणि एका उंच रॉक पॅच ने आमचं स्वागत केल. रॉक पॅच म्हणजे दगडी चढण. 70-80 अंशाच्या कोनाच्या चढणीवरुन चढताना मला प्रथम भिती वाटली. पण खर तर रॉक पॅच वरुन चढताना फारसा धोका नसतो अस नंतर आढळून आल. उलट उतरताना पाय घसरण्याची भिती असते. एक रॉक पॅच संपतोय तर असे आणखी दोन पुढे आहेत अशी बातमी पुढल्या ग्रुपने दिली. पण आता भीड चेपली होती. ते रॉक पॅच पार करुन संध्याकाळी 5.15 वाजता आम्ही शिखरापाशी पोहोचलो. तोवर अंगातल सर्व त्राण निघून गेल होत. दगडावर थोडावेळ पडून राहिलो. बिस्किट, चिक्कि वगैरे सटरफटर खाल्ल. पाणी संपल होत. म्हणून अनिल अर्धा तास अंतरावरच्या एका झऱ्यावर जाऊन पाणि घेऊन आला. सगळेजण एव्हढे थकले होते की रात्रीच्या स्वैपाकाची कल्पना सोडून द्यावी लागली. तंबू उभे करुन त्यात गुरफटून झोपून गेलो. बाहेर चांदण्याची नुसती बरसात होत होती. धुक्यात गुरफटलेली शिखर, आकाशात चांदण, थंड हवा, शांत शांत आसमंत अस स्वर्गीय वातावरण होत, पण श्रमलेली शरीरे या सगळयाकडे पाठ फिरवून निद्रेच्या अधीन झाली होती.
सकाळी जाग आली ती हातापायांच्या वेदनांच्याबरोबर. सूर्य डोंगराआडून उगवत होता. धुक्याचा पडदा सूर्यनारायणाच्या किरणांनी विरघळत गेला, आणि काही वेळातच आसमंत उन्हात न्हाऊन निघाला. आम्ही वेळ न दवडता खाली वाटचाल सुरु केली. खांद्यावर सॅक टाकल्यावर सगळया वेदना विसरुन जोमाने चाल सुरु केली. वीस मिनीटे वाटचाल करतो तो पाण्याचा एक झरा सापडला. पोटात कावळे ओरडू लागले होते. तिथे डेरा टाकला. पिशवीतले मॅगी, कांदे, बटाटे बाहेर काढले. कांदे, बटाटे, मॅगी, चटणी सगळयाचं मिश्रण शिजवल. हा पदार्थ अप्रतिम सुंदर लागला. शिवाय कांदे, बटाटे चुलीत भाजून खाल्ले. ते ही फार छान लागले. नंतर चहा केला. हा सगळा प्रोग्रॅम फार छान झाला.
नंतर परत खाली वाटचाल सुरु झाली. सुरवातीला फार जोमाने चालत निघालो. फोटो काढून झाले. जस जस उन वाढत चालल तशी दमछाक होऊ लागली. डोंगर बोडके होते, त्यामुळे उन नुसत भाजून काढत होत. गिरीगद्दे नावाच्या एका गावात जेवण मिळते, परंतु वेळ नसल्यामुळे जेवणाचा कार्यक्रम रद्द करावा लागला. तोवर 1.00 वाजला होता. पुढे जंगल आहे असा दिलासा गिरीगद्देच्या लोकांनी दिला होता.
अर्धापाऊण तास चालल्यानंतर एकदाच जंगल आल. पण तोवर अवस्था बिकट झाली होती. साारख उतरुन उतरुन गुडघ्यातील स्नायू फार दुखायला लागले होते. जवळचा पाण्याचा साठा संपत आला होता. पोटातल्या भूकेची तर जाणीवच नव्हती. जंगल जवळजवळ 4 किमी होतो. संध्याकाळच्या आत जंगलाबाहेर पडायच होत. पण चालण मुश्किल बनल होत. उतार सतत होता. सपाट वाट तर नव्हतीच. पुढे पुढे तर गुडघ्यातील जोरच गेला. भेलकांडल्यासारख चालत होत. ते 4 किमी सर्वात बिकट होते. संध्याकाळी 6.00 वाजता कसेबसे जंगलाबाहेर पडलो. गावात/माणसात यायचं सुख किती होत ते शब्दात सांगता येणार नाही. जंगल, निसर्ग कितीही सुंदर असल तरी माणूस माणसांशिवाय जगू शकत नाही.
सुब्रह्मण्यम हे सुंदर गाव आहे. एक मोठा डांबरी रस्ता, बाकीचे लाल मातीचे रस्ते. नारळ, सुपारीच्या बागा, शेजारी कुमारपर्वतम. केवळ अप्रतिम. इथे सुब्रह्मण्यम स्वामींचे मंदिर आहे. मंदिर फार सुदर आहे. प्रथम लॉज बुक केले. अंघोळ केली. दर्शन घेतल, जेवलो आणि झोपी गेलो.
सोमवारी सकाळी दोन गट पडले. उपेंद्र, दिलिप आणि धनंजय बंगलोरला निघाले. आम्ही इतर पाचजण मंगलोरला जाण्यासाठी निघालो. मंगलोरजवळ उल्लाळ नावाचा बीच आहे. सुब्रह्मण्यम पासून मंगलोर चार तासांचा प्रवास आहे. दुपारी मंगलोरला पोहोचलो. बीचवर गेलो. समुद्राची खारी हवा मनसोक्त खाल्ली.
सोमवारी रात्री आमची ‘स्वारी’ संपवून मंगलोर-बंगलोर लक्झरी बसमध्ये बसलो. रात्रभर बसमध्ये झोपून मंगळवारी सकाळी बंगलोरास दाखल झालो.