दिनांक 21 व दिनांक 22
मुंबई ते चेन्नई
21 तारखेला रात्री 8.20 च्या चेन्नई एक्स्प्रेसने 68 जणांच्या गटासोबत ‘तामिळनाडू पर्यटन महामंडळातर्फे’ आयोजित ‘रेल कम रोड’ टूरला आरंभ केला. दहा दिवसांच्या या सहलीमध्ये कांचीपुरम, मदुराई, कोडाई, कन्याकुमारी, रामेश्वरम्, त्रिची, तिरुपति, महाबलीपुरम् आणि चेन्नई या ठिकाणांचा समावेश आहे.
रात्री 8.25 च्या सुमारास ट्रेनने दादर स्टेशन सोडले. रात्री 12.00 वाजता पुणे, सकाळी 4.30 वाजता सोलापुर असा प्रवास सुरु होता. सकाळच्या सुमारास महाराष्ट्राची सीमा संपून कर्नाटक राज्य सुरु झाले. गुलबर्गा हे कर्नाटकमधील पहिले स्टेशन. शहाबादी फरशांना त्यांचे नाव मिळवून देणारे ‘शहाबाद’ हे स्टेशन वाटेत लागले. येथील घरांवरही शहाबादी फरशा असतात. रायचूर वगैरे स्टेशन्स घेत सकाळी 11.00 वाजता आंध्रची हद्द सुरु झाली. हा सगळा भाग रखरखित आहे. कुठे पाण्याचा टिपूस दृष्टीस पडत नाही. नद्यांची पात्रे कोरडीठाक होती. क्षितिजापर्यंत पसरलेले माळरान भकास दिसते. डोंगर औषधालासुध्दा नाहीत. नाही म्हणायला चित्रविचित्र आकारांचे खडक एकमेकांवर रचून तयार झालेली निसर्गनिर्मीत शिल्पे मात्र लक्ष वेधून घेतात. ही निसर्गाची जादू कशी तयार झाली असावी, कोण जाणे? माळरानांच्या भकासपणात मधून मधून सूर्यफुलांची पिवळीधम्मक शेते मात्र उठून दिसतात. वाटेत रेणूगुंठा नावाचे स्टेशन लागते. येथे उतरुन तिरुपतिला जाता येते. रेणूगुंठाच्या पुढे थोडया अंतरावर तामिळनाडूची सीमा सुरु झाली. रात्री 8.10 च्या सुमारास ट्रेन चेन्नई स्टेशनवर आली.
आगमन आणि स्वागत
सामान घेऊन गाडीतून उतरतो आहोत तोच ‘तामिळनाडू टूरिझम’ असा पुकारा करीत एक व्यक्ती आमच्याकडे येत असताना दिसली. त्या व्यक्तीने फुलांचे हार घालून सर्वांचे स्वागत केले. स्वागत करण्याची ही अभिनव व सुंदर कल्पना फार आवडली. या छोटयाशा कृतीतून सहलीच्या आयोजकांचे अगत्य सुंदर रितीने व्यक्त झाले. नंतर लक्झरी बसमधून आम्हाला ‘ड्राईव्ह इन’ या गार्डन रेस्टॉरंटमध्ये नेण्यात आले. तेथे आमच्यासाठी रात्रीचे भोजन आयोजित करण्यात आले होते. बुफे प्रकारचे जेवण होते. पदार्थ रुचकर होते. पाहुणे मुंबईहून आले आहेत याचे विशेष ध्यान ठेऊन त्याप्रमाणे मेनू ठरविला होता. अशा छोटया छोटया गोष्टींतून TTDC ने सहलीसाठी अनुकुल असे सुखदायी वातावरण बनविले होते. जेवणानंतर TTDC चे MD आणि दक्षिण रेल्वेचे स्थायी संचालक यांची भाषणे झाली. त्यांच्या भाषणांतून अशा प्रकारच्या सहलींमागची त्यांची भूमिका स्पष्ट झाली.
चेन्नई ते कांचीपुरम्
जेवणानंतर चेन्नईपासून 75 किमी अंतरावर असणाऱ्या कांचीपूरम या ठिकाणी जाण्यास सुरुवात केली. सुमारे दिड तासांच्या प्रवासानंतर रात्री 12.15 वाजता कांचीपूरम्च्या ‘हॉटेल तामिळनाडू’ मध्ये दाखल झालो. 24 तासांचा रेल्वे प्रवास, 2 तासांचा बस प्रवास यांनी शिणलेली शरीरे घेऊन रुममध्ये दाखल झालो, आणि काही वेळातच निद्रादेवीच्या प्रदेशात बुडुन गेलो.
दिनांक 23
कांचीपूरम् : एकांब्रेश्वर व कामाक्षी
सकाळी साडेपाचच्या सुमारास उठलो. केवळ 4-5 तासच झोप मिळू शकली. आवरुन 7 च्या सुमारास ब्रेकफास्टसाठी रेस्टॉरंटमध्ये दाखल झालो. उपमा, डोसा, मेदूवडा असा भरगच्च ब्रेकफास्ट होता. आपल्या आतिथ्याने आम्हाला दिपवून टाकण्याचे TTDC च्या मनाने घेतले आहे असे दिसते. पदार्थांची चव उत्तम होती. इतका ब्रेकफास्ट केल्यावर दुपारच्या जेवणाची गरज नाही. ब्रेकफास्ट नंतर दाक्षिणात्य पध्दतीची – कमी साखर, जास्त कॉफी पावडर अशी कडवट चवीची कॉफी पिऊन ताजेतवाने झालो. कॉफी प्यावी तर ती अशी!
कांचीपूरम् हे प्राचीन नगर. पल्लव, चोल यांच्या काळापासून प्रसिध्द. चोलांची तर ही राजधानी होती. कामकोटी शंकराचार्यांचे पीठ येथे आहे. येथील एकांब्रेश्वर व कामाक्षी ही मंदिरे बघीतली. एकांब्रेश्वराच्या मंदिराच्या आवारात 3500 वर्ष पुर्वीचे एक आंब्याचे झाड दाखवितात. या झाडाखाली बसून पार्वतीने शंकाराशी विवाह व्हावा म्हणून आराधना केली अशी आख्यायिका आहे. झाड पुराणवृक्ष वाटते खरे! याच्या 4 फांद्या होत्या. प्रत्येक फांदीवरील आंब्याची चव वेगळी असते. सध्या पैकी दोनच फांद्या शिल्लक आहेत.
सर्व दाक्षिणात्य मंदिरांचे समान वैशिष्टय म्हणजे प्रवेशद्वारापाशी असणारी भव्य गोपुरे, मंदिरात गाभाऱ्याभोवतीचे लांबरुंद प्राकार, आणि सर्वत्र देखणी शिल्पकला. पाषाण शिल्पकला परिपूर्ण स्वरुपात पहावी तर ती या प्रदेशात. शेकडो हजारो अनामिक शिल्पकारांची जीवने व्यापून टाकणारा ध्यास म्हणजे ही शिल्पे. शिल्पकारांच्या पिढयान् पिढया राबल्या असतील. त्यांच्या अमर्याद ध्येयासक्तीतून आणि अप्रतिम कारागिरीतून ही शिल्पे निर्माण झाली आहेत. त्यांच्या कलेसमोर नतमस्तक झालो. या मंदिरांमधले वातावरणही भारल्यासारखे राखलेले असते. समया, निरांजनांचा मंद प्रकाश, दाक्षिणात्य वाद्यांचा खणखणाट, प्रचंड दगडी शिल्पांतून वाट काढीत चाललेला आपला प्रवास एका निराळयाच जगाची सफर घडवून आणतो.
कांचीपूरम् : सिल्क हाऊस
यानंतर भेट दिली ती कांचीपूरम् येथील एका प्रमुख सिल्क हाऊसला. कांचीपूरम्मधील जवळ जवळ निम्मे लोक (40 ते 50 हजार) हातमागावर वस्त्रे विणण्याचा व्यवसाय करतात. 6 व्या शतकापासून ही कला चालत आलेली आहे. प्रसिध्द कांजीवरम साडी इथलीच. पारंपारिक कांजीवरम साडीची किंमत 3-4 हजारांपेक्षा अधिक असते. येथे वस्त्रांवर 20% सूट कुणालाही मिळू शकते. परंतु TTDC च्या सहयोगाने आमच्या गटाला 40% एवढी भरघोस सूट मिळाली. त्यामुळे सगळयांनाच मनसोक्त खरेदी करता आली.
कांचीपूरम् ते मदुराई
कांचीपूरम् येथील खरेदी आटोपून नंतर मदुराईकडे प्रवास सुरु झाला. 425 किमीचा हा लांब पल्ला होता. सकाळी 11.00 वाजता सुरु झालेला हा प्रवास रात्री 8.15 वाजता मदुराईमध्ये सुफळ संपूर्ण झाला. वाटेत त्रिची हे मोठे शहर लागले. तामिळनाडूमध्ये चेन्नाई, मदुराई, त्रिची, सेलम व कोईमतूर ही मोठी शहरे आहेत. चेन्नई – त्रिची – मदुराई या NH45 या हायवेने आमचा प्रवास झाला.
दिनांक 24 मदुराई – कोडाईकानल
मदुराई
तामिळनाडूमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर – मदुराई. थोडासा पुण्यासारखा चेहरामोहरा असणारे हे शहर वैगेई नदीच्या दोन्ही बाजूस वसले आहे. ‘मीनाक्षी’ मंदिर हे मदुराईमधील सर्वात मोठे मंदिर. तशी मदुराईमध्ये असंख्य मंदिरे आहेत. ‘मीनाक्षी’ मंदिर पल्लव, चोल वगैरे राजघराण्यांनी बांधत आणलेले आहे. बाह्यसीमेवरील 4 भव्य गोपुरे, अंतर्भागामध्ये अनेक लहानमोठी गोपुरे, विस्तृत प्राकार आणि मीनाक्षी व शिवशंकर यांची मंदिरे अशी याची रचना आहे. टिपीकल दाक्षिणात्य मंदिरासारखे हे भव्यदिव्य मंदिर आहे.
मदुराई ते कोडाई
मीनाक्षी देवीचे सकाळी लवकर दर्शन करुन ब्रेकफास्टसाठी रेस्टॉरंटमध्ये दाखल झालो. ब्रेकफास्ट आटोपून सकाळी 9.30 च्या सुमारास कोडाईकडे कूच करण्यास सुरुवात केली. 70 किमीचा हायवे व नंतर 53 किमीचा घाट असा रस्ता आहे. घाटरस्ता निलगिरी, साग अशा विविध प्रकारच्या वनस्पतींनी आणि रानफुलांनी सजलेला आहे. जसजसे वर जावे, तशी हवा थंड व्हायला लागते. हवेतला सुखद गारवा मन प्रसन्न करीत असतो. या रस्त्यावर ‘मोगरा फुलला’ ही कॅसेट ऐकत होतो. गाण्यांतील शब्द वेगळाच परिणाम करीत होते. सुखदायी हवेमुळे आधीच सुंदर असणारी गाणी अधिकच सुंदर वाटत होती. कोडाईला पोहोचताना एकदा धुक्याचे लोट येऊन गेले.
याच धुक्याच्या लोटांनी नंतर सगळे पॉईंट्स आपल्या कवेत घेतले. त्यामुळे काही पाहता आले नाही. तरी धुक्याच्या पटलांतून फिरण्याचा आनंद काही कमी सुखदायी नसतो. अशी हवा अनुभवणे ही ही एक अवीट गोडीची गोष्ट असते. संध्याकाळी तलावामध्ये बोटिंग केले. लवकर जेवलो. आज जरा निवांत आहे. गेले 3 दिवस प्रवास आणि स्थळदर्शन यामध्ये एका क्षणाचीही फुरसद मिळाली नाही. आज त्यामानाने मोकळा वेळ आहे, आणि उद्या फार लवकरही उठायचे नाही.
ताजा कलम
मदुराईमधल्या हॉटेलमध्ये प्रवेशद्वाराजवळच्या छोटयाशा बागेमध्ये बकुळीची 7-8 झाडे रांगेत उभी होती. या दुरवरच्या प्रदेशात बकुळीच्या ओळखीच्या सुगंधाने गावाकडचं माणूस भेटल्याचा आनंद झाला. सकाळी बकुळीची फुलं वेचत, त्यांचा वास घेत सकाळ सुगंधी करुन टाकली. दिवसाची सुरुवात छान झाली.
दिनांक 25 कोडाई – कन्याकुमारी
कोडाई : सिल्व्हर कॅस्केड
दि. 24 ची रात्र हुडहुडी भरवणाऱ्या थंडीची होती. हवामानातील हा बदल फारच सुखावणारा होता. 24 च्या रात्री निवांत झोप मिळाली. त्यामुळे 25 च्या सकाळी Charge Up होऊन सर्वजण तयार झाले.
सर्वप्रथम परतीच्या वाटेवर सिल्व्हर कॅस्केड (चंदेरी गुंफण?) या धबधब्यापाशी थांबलो. हा धबधबा फारसा उंच नसला तरी फोटोजिनीक आहे. पाण्याचा आवाज आणि प्रवाहाचे सुंदर दृश्य सभोवतालच्या निसर्गरम्य परिसराच्या कोंदणात उठून दिसते. कोडाईला जाताना व कोडाईचा निरोप घेताना हा धबधबा अगत्याने हसून आपल्याशी सलगीचे नाते जोडतो आहे असे वाटते.
कोडाई ते कन्याकुमारी
कोडाईचा घाट उतरुन कन्याकुमारीकडे कूच सुरु केले. मधला थोडसा अरुंद रस्त्याचा पॅच ओलांडून बस NH7 या हायवेला लागली. हा महामार्ग बराचसा सरळ व समतल आहे. सुमारे 65 किमी प्रतितास या वेगाने ड्रायव्हर (त्याचे नाव कन्नन) गाडी पळवित होता. हे कन्नन महाशय गाडी खुपच सुरक्षित आणि सफाईने चालवितात. दिवसाला सरासरी 300-350 किमीचा प्रवास होतो आहे. तरीही कन्नन यांचा चेहरा कधी मरगळलेला, थकलेला नसतो. संध्याकाळी सुमारे 6.00 वाजता कन्याकुमारीत पोहोचलो.
NH7 कन्याकुमारीपर्यंत येऊन सरळ समुद्रात घुसतो. हायवेचा याहून चांगला Dead End दुसरा नसेल. कन्याकुमारी छोटेसे गाव आहे. हॉटेल तामिळनाडू अगदी समुद्राच्या किनाऱ्यापाशीच आहे. खोलीच्या गॅलरीतून समोर समुद्र दिसतो. श्रीवर्धन – हरेश्वरच्या सरकारी गेस्टहाऊसमधूनही समुद्र दिसतो. तिथे आपल्याला रहायला मिळावं असं अनेकदा वाटायचं. तीन समुद्रांच्या काठावर या खोलीत राहिल्यावर मात्र ती इच्छा त्रिफळ संपूर्ण झाली.
गांधी मंडपम्, कामराज मंडपम्
कन्याकुमारीमध्ये कामराज मंडपम्, गांधी मंडपम् अशी स्मारके आहेत. गांधी मंडपम्मध्ये गांधीजींचा अस्थिकलश ठेवला आहे. मंडपम्ची रचना वैशिष्टयपूर्ण आहे. बाहेरुन पहाताना मंडपम्चा आकार चर्चसारखा दिसतो. मधल्या भागातील रचना मंदिरासारखी आहे, तर, अंतर्भाग मशिदीच्या घुमटाप्रमाणे आहे. या घुमटामध्ये एक लंबवर्तुळाकार छिद्र आहे. 2 ऑक्टोबरला दुपारी 12.20 वाजता, सूर्यकिरण थेट अस्थिकलश ठेवलेल्या पेटीवर पडतात. मंडपम् 3 मजली आहे. त्याची उंची 79 फुट आहे. मंडपम्मध्ये गांधीजींच्या जीवनावर आधारित अनेक छायाचित्रे एनलार्ज करुन लावले आहेत. कामराज मंडपम्मध्येही कामराज यांच्या जीवनावर आधारित चित्रदालन आहे. कामराज हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री. तामिळनाडूच्या स्वातंत्र्योत्तर उभारणीमध्ये कामराज यांचा सिंहाचा वाटा आहे.
कन्याकुमारी मंदिर
यानंतर कन्याकुमारी मंदिराकडे गेलो. कन्याकुमारी ही पार्वतीची कुमारी आवृत्ती. अशी कथा आहे की श्रीशंकर केरळमधून पार्वतीशी विवाह करण्यासाठी येत असताना नारदांच्या कळीमूळे वेळ टळून गेली आणि श्रीशंकरांना वाटेतच थांबावे लागले. कन्याकुमारी रुपातील पार्वती त्यामुळे अविवाहितच राहिली. या मंदिरातील आणखी एक वैशिष्टयपूर्ण गोष्ट म्हणजे मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वेकडे नसून उत्तरेकडे आहे. याचे कारण असे सांगतात की, देवीच्या नाकात असलेले हिरे चमकून त्यामुळे पूर्वेकडील समुद्रात संचार करणाऱ्या जहाजांची दीपगृह समजून दिशाभूल होते. देवीच्या नाकातील हिरे फारच तेजस्वी आहेत. देवीची मुर्तीही साजिरी आहे. मंदिरात प्रवेश करताना पुरुषांना शर्ट व बनियन काढून प्रवेश करावा लागतो. केरळ बाजूच्या सर्व मंदिरात हिच प्रथा आहे.
ढग कालपासूनच मागे लागले आहेत. आज सूर्यास्त ढगांआड दडला. उद्या सूर्योदय तरी चांगला पहायला मिळेल अशी आशा करुया.
दिनांक 26
कन्याकुमारी – रामेश्वरम्
संध्याकाळी सूर्यास्त पहायला मिळाला नाही म्हणून हळहळत झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 5.30 च्या सुमारास बाहेर पडलो. सूर्योदय पहाण्यासाठी त्रिवेणी संगम या ठिकाणी पोहोचलो. येथे एक कुंड आहे. तिथे तीनही समुद्र – बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र एकत्र मिळतात असे मानतात. काही जणांच्या मते तिन्ही समुद्रांचे पाणी वेगवेगळया रंगांचे – पांढरे, काळे, तांबडे दिसते. किनाऱ्यावर स्वामी अय्यप्पांचे शिष्य गर्दी करुन होते. ही लोक वर्षाच्या या कालखंडात दक्षिणेकडील सर्व मंदिरांना भेटी देत शेवटी सबरीमलाई येथे एकत्र येतात. आपल्याकडील वारकऱ्यांसारखेच हे लोक असतात. काळी लुंगी, वर उघडे असे हे अय्यप्पे सगळया देवळांत भेटले.
कन्याकुमारी : सूर्योदय
सूर्योदय नेमका कुठून होणार याचा वेध घेत, त्याप्रमाणे योग्य जागा निवडण्यासाठी फिरलो. सगळीकडे अय्यप्पांनी पहिली फळी अडवून धरली होती. शेवटी त्यातल्या त्यात कमी गर्दीच्या ठिकाणी उभे राहून सूर्याची वाट पाहू लागलो. बरोबर 6 वाजून 16 मिनीटांनी समुद्राच्या पोटातून सूर्याच्या लालबुंद गोळयाची किनार प्रकट झाली. जमलेल्या गर्दीने टाळयांचा कडकडाट केला. भाविकांनी भक्तीभावाने हात जोडले. या दृश्यातील सौंदर्य मी समजू शकलो, परंतु हा भक्तिभाव? तो गमावून आपण काय गमावलयं?
ढगांच्या पडद्याआडून सूर्यबिंबाचे दर्शन होत होते. पूर्ण सूर्यबिंब उगवताना पहाता आले नाही तरी खंडित रुपात पहाता आले याचे समाधान वाटले. समुद्रातून सूर्योदय पूर्वेकडील सर्व किनाऱ्यांवरुन दिसू शकतो. मात्र सूर्योदय व सूर्यास्त दोन्ही पहाता येणारा भारतातील हा एकमेव किनारा. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पश्चिमेकडे अस्तास जाणारा सूर्य व पूर्वेकडून उगवणारा पूर्णचंद्र असे अपूर्वाईचे दृश्य येथून पहाता येते.
कन्याकुमारी : शिला स्मारक
खोलीवर आलो. अंघोळ उरकली. ब्रेकफास्ट करुन बाहेर पडलो. बराच वेळ रांगेत उभे राहिल्यानंतर बोटीमध्ये बसलो. सुमारे 70-80 जणांना घेऊन जाणारी ही बोट सुमारे 5 मिनीटांत आपल्याला विवेकानंद शिला स्मारकाच्या प्रवेशद्वारापाशी नेऊन सोडते. स्मारकाच्या आत प्रवेश केला. तिथे एका मराठी गृहस्थांनी आमचे स्वागत केले. अस्खलीत मराठीत त्यांनी स्मारक आणि विवेकानंद केंद्राविषयी माहिती दिली. हे शिलास्मारक ज्यांच्या मनात आधी बांधून पूर्ण झाले ते एकनाथजी रानडे – संघाचे प्रचारक. त्यांच्या एक तपाच्या अखंड परिश्रमांतून हे स्मारक निर्माण झाले. या स्मारकाच्या निर्माणासाठी त्यांनी केंद्र सरकार, सर्व राज्य सरकारे, सर्वांना ही कल्पना पटवून दिली. त्याहून महत्वाचे म्हणजे सामान्य माणसांकडून प्रत्येकी 1 रुपया जमा करुन त्यांनी 30 लक्ष रुपये जमविले. अथक अशा परिश्रमांतून हे स्मारक उभे राहिले. केवळ दगडी स्मारकाद्वारे स्मृती जतन केली जाईल, परंतु विचारांचा चैतन्यस्रोत वाहता रहाण्यासाठी अविरत कार्य चालू रहाण्याची गरज आहे हे ओळखून एकनाथजींनी विवेकानंद केंद्र उभारले. या केंद्राद्वारे धर्मरक्षण, लोकसेवा साधली जाते. आज हे केंद्र अरुणाचल, अंदमान अशा दुर्गम ठिकाणी शाळा चालविते. आरोग्य, स्वच्छता इत्यादिसाठी उपक्रम राबविते.
शिलास्मारकाच्या वर्णनाआधी या शिलास्मारकाचे स्थानमहात्म्य समजून घेणे आवश्यक आहे. 25 डिसेंबर 1892 या दिवशी स्वामी विवेकानंद कन्याकुमारी येथे होते. 2 वर्षांची भारत-भ्रमंती झाली होती. कन्याकुमारीच्या किनाऱ्यावर त्यांना हा खडक दिसला. नावडयाने पैशाशिवाय खडकापर्यंत सोडण्यास नकार दिला तेव्हा स्वामीजी पोहत पोहत खडकापर्यंत पोहोचले. सतत 3 दिवस स्वामीजी ध्यानमग्न अवस्थेत होते. या ध्यानमग्न अवस्थेत त्यांना दोन वर्षांत पाहिलेला भारत दिसला असेल. रामकृष्णांची शिकवण आणि भ्रमंतीचा अनुभव यांची सांगड घालून त्यांना त्यांचा जीवनमार्ग प्रकाशमान झालेला दिसला असेल. सतत 3 दिवस आणि 3 रात्री, अन्नपाण्याशिवाय, चारही बाजूला गर्जणारा दर्या, असे स्वामीजी ध्यानस्थ होते. याची परिणीती 1893 मधील विश्व धर्म परिषदेतील विश्वविजयात झाली.
अशा या शिलास्मारकात प्रवेश करताच मांगल्याने, गांभीर्याने आणि तेजाने मंडित वातावरण जाणवते. विवेकानंदांची मूर्ती असणारे सभागृह आणि त्याखालील ध्यानमंडपम्. या ध्यानमंडपामध्ये या ध्यानमंडपामध्ये काही क्षण स्वत:ची ओळख विसरुन घालवावेत. स्वामीजींच्या जीवनदर्शनाशी एकरुप व्हायचा प्रयत्न करावा. तेजाचा एक तरी किरण अंतरंगात सामावून घ्यावा.
या स्मारकामध्ये उभे राहिल्यावर तीनही बाजूला समुद्र दिसतो, तर चौथ्या बाजूला दिसते ते भारताचे दक्षिण टोक. येथून दक्षिण दिशेला सरळ 15000 किमी पर्यंत जमीन नाही. नंतर आहे तो अंटाक्टर्िका खंड. मातृभूमीचे असे तिच्या चरणाशी उभे राहून दर्शन घेण्याचे सुख अनुभवले.
शिलास्मारकाच्या जवळच थिरुवल्लूर या सुप्रसिध्द तामिळी कवीची 133 फुट उंचीची मूर्ती आहे. हा तामिळमधील महाकवी. याच्या काव्याला तामिळमध्ये वेदांचे स्थान आहे.
कन्याकुमारी ते रामेश्वरम्
शिलास्मारक दर्शनानंतर थेट निघालो ते रामेश्वरम्कडे. NH7 वरुन मदुराईच्या अलिकडे NH49 या हायवेवर आलो. हा हायवे कोचीन ते रामेश्वरम् असा आहे. रामेश्वरम् बेटावर प्रवेश करेपर्यंत रात्र झाली.
दिनांक 27
रामेश्वरम् – त्रिची (श्रीरंगम्)
श्रीरामांनी लंकेमध्ये जाण्यासाठी जिथून सेतू बांधण्यास सुरुवात केली, ते भारताच्या दक्षिण-पूर्व टोकावर वसलेले एक बेट – रामेश्वरम्. येथे लंकाविजयापूर्वी श्रीरामांनी स्वहस्ते शिवलिंग स्थापून त्याची पूजा केली होती आणि श्रीशंकराचा आशिर्वाद मिळविला होता. श्रीराम हे विष्णूचे अवतार. अशाप्रकारे रामेश्वरम् हे ठिकाण शैव आणि वैष्णव या दोहोंकरीता पवित्र आहे. येथे शैव व वैष्णव दैवतांचा सुंदर संगम झाला आहे.
रामेश्वरम् येथे अग्निकुंड हे समुद्रातील कुंड व इतर 22 कुंडे (गंगा, यमुना इ.) आहेत. या सर्व कुंडांमध्ये स्नान केले असता सर्व पापांचा नाश होतो वगैरे. रामेश्वरम्चे मंदिर समुद्रकाठी आहे. मंदिर भव्यदिव्य आहे. आमच्यापैकी ज्यांना कुंडस्नान करायचे होते ते लोक सकाळी साडेचारपासून उठून मंदिरात गेली होती. आम्ही साडेपाचच्या सुमारास मंदिरात पोहोचलो. येथे स्फटिकाचे एक शिवलिंग आहे. त्याचे दर्शन सकाळी 5 ते 6 या वेळेतच होते. दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलो.
रामेश्वरम्च्या दक्षिणेकडे धनुष्कोडी नावाचे एक बेट आहे. या गावात पूर्वी रेल्वे स्टेशन होते. 1964 सालच्या वादळात समुद्र खवळला आणि हे बेट त्याने गिळंकृत केले. श्रीरामांचा सेतू येथूनच सुरु होतो असे मानतात.
रामेश्वरम्वरुन परतताना वाटेत समुद्र ओलांडावा लागतो. सुमारे 2.5 किमी लांबीचह हा पूल पांबन या गावी आहे. या पुलाला इंदिरा गांधी ब्रिज असे नाव देण्यात आले आहे. हा पूल बराच उंच असला तरी शेजारचा रेल्वे ब्रिज मात्र फारच कमी उंचीवर आहे. मोठी जहाजे जेव्हा या समुद्रातून जातात तेव्हा रेल्वेचा पुल दोन्ही बाजूंनी थोडया लांबीपर्यंत वर उचलला जातो.
रामेश्वरम् हे भारताच्या पवित्र स्थानांपैकी एक. हे एक ज्योर्तिंलिंगही आहे. मंदिर भव्यदिव्य आहे. दर्शन मात्र फार लांबून आणि चुटपुटते घ्यावे लागते. येथेही अय्यप्पाभक्तांची गर्दी असल्यामुळे गोंधळाचे वातावरण होते.
रामेश्वरम् ते त्रिची
रामेश्वरम्हून निघालो ते 275 किमी अंतरावरील त्रिची येथे येण्यासाठी. आधी NH49 व नंतर NH210 मार्गावरुन त्रिचीजवळील श्रीरंगम येथे पोहोचलो. श्रीरंगम् हे मंदिर 150 एकर एवढया प्रचंड भागात पसरलेले एक शहरच आहे.
श्रीरंगम्
श्रीरंगम् हे विष्णूचे स्थान आहे. हे ठिकाण दोन नद्यांच्या दुबेळक्यात वसलेले एक बेट आहे. याला मध्यरंग असेही म्हणतात. अशीच दोन मंदिरे आदिरंग व अंत्यरंग म्हैसूरजवळ आहेत.
श्रीरंम् मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील गोपुर 224 फुट उंच आहे. मंदिराचा परिसर विविध मंदिरांनी भरलेला आहे. मुख्य मंदिरात प्रवेश करण्यासाठी ओळीने सात गोपुरे ओलांडावी लागतात. श्रीरंगाचे दर्शन मात्र खुप जवळून व मनोभावे घेता आले. शेषशायी विष्णूची काळया पाषाणात घडविलेली प्रचंड मूर्ती आहे.
त्रिची हे शहर तामिळनाडूतील पंचमहानगरांपैकी एक आहे.
दिनांक 28
त्रिची – तिरुपति
आजचा सर्व दिवस प्रवासात गेला. सकाळी 6.20 च्या सुमारास सुरु झालेला प्रवास संध्याकाळी 6.00 च्या सुमारास पद्मावती मंदिरापाशी संपूर्ण झाला. हे पद्मावती देवीचे (लक्ष्मी) मंदिर तिरुपतिपासून 4 किमी अंतरावर आहे. आंध्र प्रदेशमधील या मंदिराभोवतीची दिव्यांची रोषणाई लक्ष वेधून घेत होती. मंदिराचा परिसर विस्तीर्ण आहे. मंदिराची रचना साधारण दाक्षिणात्य मंदिरांप्रमाणेच आहे. मात्र सर्वत्र दिव्यांचा झगमगाट होता.
पद्मावती देवीचे दर्शन घेऊन तिरुपति येथे आलो. येथे हॉटेल ब्लिझ या त्रितारांकित हॉटेलमध्ये आमची राहण्याची सोय केली आहे. हे हॉटेल आत्तापर्यंतच्या सर्व हॉटेल्सच्या वरताण आहे. सर्व तारांकित सुखसोयी आहेत. या हॉटेलमधील मुक्काम हिच आजच्या दिवसातील सर्वोत्तम गोष्ट आहे.
दिनांक 29
तिरुपति – महाबलीपुरम्
दुसऱ्या दिवशी सकाळी तिरुपतिस जाण्यास सिध्द झालो. TTDC च्या बसने आम्हाला आलिपिरी या स्थानकापाशी सोडले. तिरुपतिचे मंदिर प्रत्यक्षात तिरुमला या डोंगरावर आहे. तिरुपतिपासून मंदिराचे अंतर 24 किमी आहे. मंदिराकडे जाण्यासाठी APSRTC च्या बसेस तसेच देवस्थानच्या बसेस आहेत. आम्ही APSRTC च्या बसने तिरुमलाचा प्रवास सुरु केला.
मंदिराची वाट गर्द झाडीने झाकलेली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला देवस्थान ट्रस्टने शोभेची झाडं, फुलझाडे लावलेली आहेत. रस्त्यावर राखलेली स्वच्छता उल्लेखनीय आहे. मंदिराच्या वाटेवर आणि वर देवस्थानच्या परिसरात धुम्रपान, तंबाखूसेवन इत्यादि सर्व गोष्टी वर्ज्य आहेत. त्यामुळे इतर ठिकाणी दुर्मिळ असणारी स्वच्छता येथे आढळून येते.
बसचा प्रवास सुमारे पाऊण तासाचा आहे. देवस्थानच्या परिसरात हवेत जाणवेल एवढा गारवा होता. तामिळनाडू टूरिझमच्या ऑफिसमध्ये सर्वप्रथम दाखल झालो. येथे आमच्या तिकिटांची व्यवस्था करण्यात आली होती. 100 रुपयांचे तिकिट TTDC ने आमच्यासाठी काढले होते. सर्वसामान्य जनतेला हे तिकिट उपलब्ध नसते. इतरांसाठी 50 रुपयांचे तिकिट असते. तिकिट काढल्यानंतर त्यांना एक बॅच मिळतो. त्या बॅचवर नोंदविलेल्या वेळी त्यांना रांगेत प्रवेश मिळतो. 100 रुपयांच्या तिकिटासाठी असा बॅच नसतो. त्यांना लगेचच रांगेत प्रवेश मिळतो. तात्काळ दर्शन हवे असल्यास 5000, 8000, 12000 अशी तिकिटे असतात.
अशा या अर्थकारणामुळे दर्शनाबद्दलचा भक्तिभाव कमी होतो. देवाच्या दारातही अशी वर्गवारी का असा प्रश्न पडतो. इथल्या स्थानिक लोकांना मात्र याचे काही वाटत नाही. त्यांना याबद्दल काय वाटते, त्यांनी ही व्यवस्था कशी स्विकारली आहे कोण जाणे? खास तिकिट काढूनही चार तास रांगेत उभे राहणे चुकले नाही. अनक स्टॉप घेत दुपारी 3 वाजता तिरुपतिसमोर पोहोचलो. 2-3 सेकंद तिरुपतिचे पुसटसे दर्शन घेऊन बाहेर आलो. भोवतालचे लोक मात्र भक्तिभावाने ओथंबून बाहेरच्या भिंतीसमोर डोके ठेवत होते, लोटांगणे घालत होते. दहा मिनीटांपूर्वी हेच लोक रांग सोडून उधळले होते. दर्शनासाठी धक्काबुक्की करीत होते. त्यांच्या या दुहेरी वागणूकीमागील लॉजिक समजले नाही.
दर्शन आटोपले, आणि परतीच्या मार्गाला लागलो. परत येताना APSRTC च्या बसमध्ये डोक्याचा चमनगोटा केलेले पाच-सहा पौडाचे पावणे होते. त्यांच्या म्हराटमोळया बोलीने जरा मनोरंजन झाले. तिरुपतिला पोचायला संध्याकाळचे पावणेसहा वाजले. संध्याकाळी सहा वाजता AP टूरिझमच्या हॉटेलमध्ये जेवलो. नंतर महाबलीपुरम्च्या वाटेला लागलो. दिवसभराच्या शीणाने झोपेच्या आहारी गेलो. रात्री अकराच्या सुमारास महाबलीपुरम्च्या बीच रेसॉर्टवर पोहोचलो. हे हॉटेलही सुंदर आहे. हॉटेलचा परिसर विस्तीर्ण आणि झाडीने झाकलेला आहे. पूर्व बाजूच्या हॉटेलच्या सीमेला खेटूनच गाजेची साद देणारा दर्या आहे. खोलीमधूनही दर्याची दाज ऐकू येते. चार पावलं चाललं की आपण किनाऱ्यावर पोहोचतो. रात्र असूनही समुद्रापर्यंत जाऊन यायचा मोह टाळू शकलो नाही. समुद्राला थोडेसे भेटून आल्यावर झोपी गेलो.
दिनांक 30
महाबलीपुरम् – चेन्नई
सकाळी सूर्योदय पहायचं मनाशी नक्की करुन झोपी गेलो खरे, पण, शरीराने साथ दिली नाही. साडेसहाच्या पुढे जाग आली. पहातो तो काय, सूर्यनारायण उदयस्थ झालेही होते. समुद्रावर गेलो. समुद्र गर्जत होता. येथील सर्वच किनाऱ्यांवरील पाणी स्वच्छ आणि नितळ आहे. महाबलीपुरम्च्या किनाऱ्यावरील वाळूही वेगळीच – रुपेरी आणि मऊसुत आहे. वाळूचा पायांना होणारा स्पर्श हवाहवासा वाटतो. समुद्रामध्ये शिरावं तर, लाटा आपल्याला कवेत घेण्यासाठी धावत येताहेत असे वाटते. लाटा वेगाने येऊन किनाऱ्यावर आदळत होत्या. लाटांच्या वेगामुळे पाण्यात उभे राहणे कठीण वाटत होते. थोडा वेळ लाटा अंगावर घेऊन आणि चिंब भिजून किनाऱ्यावर आलो. खोलीवर जाऊन अंघोळ केली. ब्रेकफास्ट करुन स्थळदर्शनासाठी सिध्द झालो.
पंचरथ (Five Rathas)
महाबलीपुरम् प्रसिध्द आहे तेथील सोळाशे वर्षे पुर्वीच्या दगडी कोरीव कामासाठी. असे सांगतात की पाषाण कोरुन लेणी निर्मीण्याची कला येथे विकसित झाली. येथील लेणी कोरीव खोदकामाचा प्रभातकाळ आहे. पहिले लेणे पाहिले ते पंचरथ किंवा (Five Rathas). वेगवेगळया आकाराची ही लेणी पांडवांचे रथ म्हणून ओळखली जातात. यातील प्रत्येक रथाची रचना वेगवेगळी आहे. वेगवेगळया शिल्पशैली जणू शिल्पकारांनी वापरुन बघितल्या असाव्यात असे वाटते. धार्मिकदृष्टया तसे या लेण्यांना काही फारसे महत्व नाही. शिल्पकलेच्या अभ्यासकांना मात्र येथे बरेच काही पहाण्यासारखे सापडेल.
किनाऱ्यावरील मंदिर (Sea Shore Temple)
दुसरे लेणे आहे ते किनाऱ्यावरील मंदिर किंवा Sea Shore Temple. हे मंदिर उत्खननात सापडले आहे. अशी सात देवळे होती. पैकी सहांना समुद्राने आपल्या पोटात सामावून घेतले आहे. समुद्रात नावेने काही अंतर गेल्यावर या मंदिरांचे अवशेष दिसू शकतात. समुद्राच्या पाण्याने या सातव्या मंदिराचीही झीज झाली आहे. शिव, पार्वती, गणेश आणि विष्णूची मंदिरे आहेत. हे शिल्पही शिल्पकारांच्या Home Work चाच एक भाग आहे.
अर्जूनाची तपश्चर्या आणि बटरबॉल
तिसरे लेणे आहे ते अर्जूनाची तपश्चर्या. हे लेणे भारतातील सर्वात मोठे लेणे आहे. ‘अर्जूनाची तपश्चर्या’ हे नाव धारण करणाऱ्या या लेण्याशी निगडीत काही कथा आहे. या लेण्यांशेजारीच एक गोलाकार शिळा आहे. याला कृष्णाचा लोण्याचा गोळा किंवा Krishna’s Butterball म्हणतात. अतिशय कमी क्षेत्रफळाने ही शिळा खालील पृष्ठभागाला जोडलेली आहे. लहानशा धक्क्याने ती खाली कोसळेल असे वाटते. मात्र गेल्या शेकडो वर्षांत अनेकदा मोठया प्रयासानेही ही शिळा कोणासही हलविता आलेली नाही. हे निसर्गनवल पहाण्यासारखे आहे.
महाबलीपुरम् ते चेन्नई
अशा प्रकारे स्थळदर्शन संपवून बीच रेस्टॉरंटला परत आलो. रेसॉर्टचा परिसर भूरळ पाडणारा आहे. 2-3 दिवस निवांत येऊन रहावं असा आहे. आम्हाला मात्र परत जायचे वेध लागले आहेत. जेवण आटोपले आणि चेन्नईचा प्रवास सुरु झाला. हा शेवटचा बस प्रवास. गेले आठ-नऊ दिवस कापरासारखे उडून गेले. अतिशय व्यस्त वेळापत्रक असूनही कधी थकायला झालं नाही की कधी आता बस्स अस वाटल नाही. अजूनही हा प्रवास संपूच नये असे वाटते आहे. मात्र हा शेवटचाच दिवस.
चेन्नई
चेन्नईमध्ये कपालेश्वराचे मंदिर पाहिले, आणि पाहिला मरीना बीच. 12 किमी लांबीचा हा बीच भारतातील सर्वात लांब बीच आहे. बीचवर जत्रा भरली होती. विविध प्रकारचे विक्रेते आणि फिरायला आलेल्यांची वर्दळ. समुद्राची पार्श्वभूमी. संध्याकाळ होत आली होती. शेजारी MGR यांचे स्मारक आहे. स्मारक देखणे आहे. काहिसे आळसावलेले आमचे लोक उगीच इकडे तिकडे फिरत आहेत. उदास रिकामपण भरुन राहिल आहे.
साडेसात वाजता Drive Inn रेस्टॉरंटमध्ये रात्रीच्या जेवणासाठी दाखल झालो. दुसऱ्या बसमधील लोकही येऊन पोहोचले. जेवण झाले. नऊच्या सुमरास बसमध्ये परत येऊन बसलो ते स्टेशनवर जाण्यासाठी. स्टेशनवर पोहोचलो. ट्रेन लागली होती. ट्रेनमध्ये बसलो. आठवणींचे गुच्छ मनात घेऊन भरल्या मनाने परतीचा प्रवास सुरु झाला.
*****
मोहम्मद अनीस
आमचा टूर गाईड. आज संध्याकाळी त्याने त्याचा पत्ता आम्हाला दिला आहे. त्याआधी त्याने आश्चर्याचा धक्का दिला, मराठीमध्ये त्याची जीवनकहाणी आम्हाला सांगून. त्याला मराठी कळते, बोलता येते अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. त्याच्या समोर त्याला तराठी समजत नाही असे समजून लोक काय काय बोलत होते! मोहम्मद गाईडचा आमच्या टूरच्या यशस्वितेमध्ये सिंहाचा वाटा आहे. सकाळी उठल्यापासून रात्री उशीरा झोपेपर्यंत सतत टूरचा विचार करणाऱ्या या गृहस्थाने ज्या पध्दतीने त्याचे कर्तव्य पार पाडले त्याला तोड नाही. बसच्या प्रवासात सगळे पेंगायचे, परंतु मोहम्मदचा डोळा लागलेला कधी कुणी पाहिला नाही. कन्ननबरोबर त्याचे सारखे हास्यविनोद चाललेले असायचे. हसतमुख चेहरा तर त्याला मिळालेले किंवा त्याने मिळवलेले दैवी वरदान असावे. कुणाच्याही, कुठल्याही प्रश्नाला त्याच्याकडे नम्र आणि हसतमुख उत्तर असायचे. वातावरणात निर्माण झालेला ताण हलका करण्याचे त्याचे कौशल्य कौतुकास्पद असायचे. स्थळदर्शनाच्या वेळी हा सतत धावत असायचा, नाहीतर डोकी मोजीत असायचा. माहिती देण्याची त्याची हातोटी प्रभावी होती. त्याच्याकडील माहितीचा साठाही मोठा होता. हिंदी भाषेवरील त्याचे प्रभूत्वही चांगले होते. त्याच्याशिवाय टूरमध्ये काहीतरी कमी वाटण्याइतके त्याचे असणे वैशिष्टयपूर्ण होते. या माणसामध्ये Potantial आहे, Spark आहे. तो खुप पुढे जावा अशी सदिच्छा सर्वांच्याच मनात असेल.
कन्नन
आमचा चक्रधर, सारथी. याला हिंदी काडीइतकेही येत नाही. परंतु प्रत्येकाच्या प्रश्नाला हसून उत्तर देत, त्याने बरेच दिवस ही गोष्ट गुलदस्त्यात ठेवली होती. ड्रायव्हिंगच्या बाबतीत मात्र हे महाशय ‘मास्टर’ होते. सुरक्षित आण्0श्निा सफाईदार ड्रायव्हिंग कसे असावे याचा वस्तूपाठ म्हणजे कन्नन यांचे ड्रायव्हिंग. हे कन्नन महाशय भलतेच श्रध्दाळू होते. सकाळी देवादिकांचे संगीत ऐकल्याखेरिज यांचा दिवस सुरु होत नसे. वाटेत कोणते देऊळ लागले की अंगारा आणण्यासाठी यांनी क्लिनरला पिटाळलेच. प्रत्येक मंदिरामध्ये हे यायचे. काही संवाद होत नसला तरी आमच्यात ते रमले होते हे त्यांच्या मोकळया स्मितहास्यातून जाणवायचे. कन्नन यांच्यामुळे आमचा प्रवास निर्धोक आणि सुखाचा झाला.
विजयेंद्र
तिसरा TTDC चा सेवक आमच्या बरोबर होता तो म्हणजे क्लिनर विजयेंद्र. हा पडेल ते काम आनंदाने करायचा. वेळ मिळेल तेव्हा हा आपला गाडी पुसत असायचा. जेवायचा, खायचा केव्हा ते कुणालाच कळायचे नाही. न बोलता त्याचे काम प्रामाणिकपणे करीत रहायचा.
अशा सुंदर लोकांच्या सहवासात टूरचे नऊ दिवस मोठया आनंदात गेले. या दिवसांत सर्वाजण वेगळयाच जगात वावरत होते. रोजच्या कटकटी, रोजचे व्याप कुणाच्याच ध्यानीमनी नव्हते. फुलपाखरासारख्या हलक्या मनाने सर्वजण विहरत होते. हा अनुभव आणि त्याच्या आठवणी सर्वांच्याच मनात दीर्घकाळ रुंजी घालत रहातील.
*****
बस प्रवास
|
दिनांक
|
पासून – पर्यंत
|
अंतर (किमी)
|
|
22
|
चेन्नई ते कांचीपुरम्
|
75
|
|
23
|
कांचीपुरम् ते मदुराई
|
425
|
|
24
|
मदुराई ते कोडाईकानल
|
123
|
|
25
|
कोडाईकानल ते कन्याकुमारी
|
293
|
|
26
|
कन्याकुमारी ते रामेश्वरम्
|
400
|
|
27
|
रामेश्वरम् ते त्रिची
|
275
|
|
28
|
त्रिची ते तिरुपति
|
410
|
|
29
|
तिरुपति ते महाबलीपुरम्
|
300
|
|
30
|
महाबलीपुरम् ते चेन्नई
|
55
|
ट्रेन प्रवास
दि. 21, 22 : मुंबई ते चेन्नई 1000 किमी
दि. 30, 31, 1 : चेन्नई ते मुंबई 1000 किमी.
उत्तम लेख ! कृपया निवडक छायाचित्रे टाकावीत !