या कविता १९९५ ते २००२ या काळात लिहिलेल्या आहेत …
कॉलेजच्या आसपासच्या दिवसातल्या असल्यामुळे त्या वयाचे सगळे दोष, सगळ्या मर्यादा त्यांच्यात आहेतच.
नंतरच्या काळात कविता भेटलीच नाही …
अजूनही कधीतरी ती भेटेल अशी आंस आहे.
मात्र आता भेटली तर तिने एकतारी असावे.
चारोळ्या
माझं मन,
निळया आभाळात भिरभिरणारा शुभ्र पक्षी,
आणि तू,
मोहोरलेलं हिरवं झाड,
त्या पक्ष्याचं घरटं
…
धुँवाधार पावसाने
ढवळला डोहाचा तळ,
आणि कणांकणांनी गोळा झाली,
तुझी विखुरलेली आठवण.
…
विरहाची वेदना काय असते,
ते आज मला कळत आहे,
चिंब चिंब पावसात,
माझं मन जळत आहे.
…
असच एका माळरानावर,
एकदा इवलाल फुल फुलल
आणि त्याच्या कौतुकात
सारं माळरान झुललं.
…
पहाटेच्या कुशीत स्तब्ध
निजलेले धुके
जसे तुझ्यासमोर आल्यावर
माझे शब्द मुके.
…
प्राजक्त मला
खुप आवडतो
कारण बहरल्यावर तो
लगेच ओघळतो
…
माझ निराश मन ओक्साबोक्शी रडल
ती माझ्या डोळयात पाहून गोड हसली
आणि आश्चर्य घडल
काळे ढग दूर पळाले
आणि चकचकीत ऊन पडल.
…
जशी एखादी कळी फुलते,
तशी गालांवरची खळी खुलते,
न कळताच काहीतरी कळते,
हृदयाला हृदयाची साद मिळते,
अशीच एखादी कविता जुळते.
…………………………………………………
आणखी चारोळ्या
उन्हाने होरपळलेला
दोन डोळयांतील स्वप्नांचा गाव
तू आलीस नि झाला
वैशाखातही श्रावणसरींचा वर्षाव.
…
मालवत्या संध्याकाळी सूर्य मावळताना
डोळयांत ऊषास्वप्न घेऊन ती येते
आणि जाताना स्वप्नांचे
हजारो सूर्य देऊन जाते.
…
पडला जेव्हा पाऊस पहिला
आणि उगवले पहिले पाते
उमगून गेले तेव्हा मजला
अमरपणाचे मृत्यूशी नाते
…
क्षितिजावरला मेघ एकला
सखेसोबती शोधीत राही
निरभ्र, मोकळ सार आकाश
साथ द्यावया कुणीही नाही
…
रात्र पौर्णिमेची
चांदण फुललय कणाकणात
चांदण पानांफुलांत
अन् पौर्णिमेचा चंद्र
तुझया माझया मनात
…
चांदण्याचे हात तुझे
घेऊ देत हाती
चांदणे हे पौर्णिमेचे
फक्त तुझ्या न् माझ्यासाठी
…
या जगात प्रत्येक गोष्टीचे
मोल द्यावे लागतात
फक्त गुलाब मिळत नाहीत
काटेही घ्यावे लागतात.
…
गंमत म्हणून मी उगीचच मी झाडावरुन फुल तोडल
माझ्या डोळयात त्याच हृदय विषण्ण हसलं
माझ मन नंतर बराच वेळ स्वत:शीच कुढलं.
…………………………………………………
आणखी काही चारोळ्या
कधी कधी वाटत,
हे जग किती रुक्ष आहे
प्रत्येकजण एकतर खाणारा
नाहीतर भक्ष्य आहे.
…
थांब चंद्रा ऐक रे
गुज माझ्या मनांतले
थरथरत्या हळव्या ओठांनी कुजबुजलेले
गुज केतकीच्या बनातले
…
तुझ प्रेम मोजताना
आभाळ पुरत नाही
तु माझी तु माझी म्हणताना
मी माझा उरत नाही
…
कविता माझी मी कवितेचा
कविता माझे श्वास
पण श्वासांचेही ओझे झाले
माझे शब्दही नि:शब्द आज
…
सामोऱ्या येणाऱ्या प्रत्येक क्षणामध्ये
मी एक नवी कविता बघतो
मी कविता लिहीत नाही
मी कविता जगतो
…
सागरा, आज तुझं
अथांग रुप पाहिलं
आणि माझ मीपण
तुला वाहिल
…
जीवनाबद्दल जास्त
विचार करण व्यर्थ आहे
कारण काहीही झाल
तरी हे शरीर मर्त्य आहे
…
एखादा दगडही बऱ्याचदा
माणसांपेक्षा खरा वाटतो
अंधारच तेव्हा
प्रकाशापेक्षा बरा वाटतो.
…………………………………………………
आणखी काही चारोळ्या
समोर येणारा प्रत्येक माणूस
एक आरसा असतो
आपला चेहरा तोच असतो, पण,
प्रत्येक आरशात वेगळा दिसतो
…
काल गुलाबाच फुल तोडताना
तिच्या बोटांतून वाहलेल्या थेंबभर रक्तामुळे
भरुन येणारे हे डोळे
आज रक्ताचे पाट वाहताना
निर्दय, कोरडे, जळलेले
…
आयुष्य म्हणजे
गरुडझेपेची काचेची स्वप्न
वास्तवाच्या खडकावर फुटण
आणि मग
पंख कापलेल्या जटायूसारख
खुरडत खुरडत फिरण
…
गवतावरचे दवबिंदू
मोत्यांचा आभास
तुझ प्रेम तरी खर?
की तो ही एक भास?
…
तू आणि मी
दोन समांतर रेषा
बरोबरीने चालणाऱ्या
पण फक्त अनंतामध्येच मिळणाऱ्या
…
तुझ माझ नात
तस आता संपल आहे
पण उमलण्याआधी कोमेजलेल एक फुल
मी हृदयापाशी जपल आहे
…
तुझ्यामाझ्यातल मैत्रीच नात
कधीच सरल आहे
सामोरं आल्यावर देण्यासाठी
कोरड स्मित तेवढ उरल आहे
…
माझी कविता
फक्त माझी आहे
तुम्ही जर माझे असाल
तर ती तुमची आहे
…………………………………………………
आणखी काही चारोळ्या
मी जेवढा माझा आहे
तेव्हढा तुमचा नसेनही
पण तुम्ही जेव्हढे माझे आहात
तेव्हढा मी नक्कीच तुमचा आहे
…
कधीतरी, कुणावर तरी
इतक प्रेम कराव की
माझयातल्या मी ला विसरुन
केवळ त्याला त्यालाच स्मराव
…
माझी कविता
माझ्या मनाचा आरसा आहे
जमल तर मला स्विकारा
मी आहे हा असा आहे
…
आज माझ्यासमोर आल्यावर अचानक
तुझी नजर अनोळखी झाली
आणि माझ्या जीवनातील अमावस्या
अधिकच काळोखी झाली
…
माझ्या घरात घरट बांधताना
चिमण्या चिवचिवतात
मनाच्या ओसाड वाळवंटातही
स्वप्नांचे गुलाब फुलवतात
…
तारुण्याच्या उंबरठयावर तसा
प्रत्येकजणच कवी असतो
पण ते कवित्व स्वत:च नसत
वेडया वयाच असत
…
पोटाची खळगी भरण्यासाठी
माणस स्वत:लाही विकतात
मरण टाळण्यासाठी वेडी
मरणाहून वाईट जीवन जगतात.
…
येणाऱ्या प्रत्येक क्षणाच
आपल्याला एक देण असत
हास्याची एखादी लकेर असते
वा अश्रूंच एखाद लेण असत
मिळणारा प्रत्येक क्षण
भरभरुन जगायच
आनंदाच्या झाडाच एखाद फुल
आपल्यांच्यासाठी मागायच.
…………………………………………………
आणखी काही चारोळ्या
शब्दांच्या निष्फळतेन
दिलेल वैराग्याच बीज
मौनाच्या गाभाऱ्यात आज
मुक्तीच क्षितीज
हिमलाट
गात्र गोठवणारी हिमलाट
सभोवती पसरत चालली.
उदासिनता अधिकच गडद झाली.
सुन्न करणारी काळोखाची सावली
आजचा चंद्रही डागाळलेला.
चांदण्याही पसरल्यात जसे
चंद्राचे केविलवाणे अश्रू.
सार काही स्तब्ध, अविचल
मृत्यूने विळखा घातल्यासारख.
माझ मनही मृतवत
काळडोहातील थंडगार पाण्यासारख.
…………………………………………………
ती
तिच्या ओठांतील अस्फूट हसू,
आणि मोठया मुश्किलीने अडवलेला,
पापणीआडचा चुकार अश्रू,
गर्द हिरव्या अंधारातून वाहणाऱ्या
स्फटिकांच्या झऱ्याप्रमाणे.
ती सर्वांची असते, पण,
तिचं मात्र कुणीच नसत.
तस झाड सगळयाच पक्ष्यांचं असत,
पण तरीदेखील खुप एकट असतं.
कधीकधी ती पहात बसते,
दूरवरच्या क्षितीजाकडे,
तेव्हा तिच्या चेहऱ्यावर वाचता येते
मनातील विचारांची गर्दी,
वावटळीत सापडल्यावर,
सैरावैरा धावणाऱ्या पानांसारखी.
कधी तिच्या सतारीतून सूर बरसतात,
काळीज कापत जाणारे.
पापणीआड लपवलेले अश्रू
मुक्तपणे ओघळतात त्यावेळी,
दुथडी वाहणाऱ्या नदीप्रमाणे
एखादी वीज चमकावी तशी,
कोणाचीतरी आठवण,
तिच्या चेहऱ्यावर उजळते, नि,
मावळतेही क्षणार्धात.
त्यानंतर ती खुप शांत होते,
पूर ओसरलेल्या नदीसारखी.
अश्रू पुन्हा लपतात पापणीआड.
आणि ओठांवर पुन्हा उमटते अस्फुट हासू,
गर्द हिरव्या अंधारातून वाहणाऱ्या
स्फटिकांच्या झऱ्याप्रमाणे.
…………………………………………………
पहिल्या प्रेमास
कधी एखादी वाऱ्याची मंद झुळुक,
बरोबर घेऊन येते जुईचा मंद सुगंध,
आणि मला घेऊन जाते,
दूर आठवणींच्या देशात.
तिथे फक्त तूच असतेस.
निरभ्र आकाशात चहूबाजूंनी,
ढगांची गर्दी व्हावी,
तशा तुझ्या एकेक आठवणी गोळा होतात,
आणि मग सुरु होते, सुगंधी क्षणांची बरसात.
आठवायला लागतात,
मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवलेली,
प्राजक्ताच्या सडयासारखी तुझी स्मितं.
डोळयासमोर येतेस,
माझया ओझरत्या स्पर्शाने शहारणारी तू,
आणि लाजेने लाल झालेला तुझा चेहरा,
मी डोळयात साठवून ठेवलेला कायमचा.
अजूनही ताज वाटत,
कालपरवा घडल्यासारख,
मी तुझी वाट पहाण,
नाही आलीस की हुरहुरण
तुझयाविषयीची एक अमूर्त, धूसर, पण,
निरतिशय सूंदर निरागस भावना,
ती अजूनही तशीच आहे.
या छोटयाशा आयुष्यात
तू परत कधी भेटशील न भेटशील,
पण तू दिलेले ते सुगंधी क्षण
मी जपून ठेवीन आयुष्यभर,
अमूल्य ठेवा म्हणून.
…………………………………………………
तुला
मी तुला विसरायचा खुप प्रयत्न करतो, पण,
अचानक पायाखालची एखादी पायवाट
जुनी ओळख दाखवते
आणि मला ओढत नेते
दूर तुझ्या आठवणींच्या देशात.
मी तुला विसरायचा खुप प्रयत्न करतो, पण,
दारातला निशिगंध
दरवळतो जेव्हा बहरुन
तेव्हा विसरतो मी
तुला विसरायच
मी तुला विसरायचा खुप प्रयत्न करतो, पण,
एखादी कविता सामोरी येते
तिच्यात दिसते तुझेच प्रतिबिंब
मनात रुतलेली ती कविता
मग विसरता येत नाही.
मी तुला विसरायचा खुप प्रयत्न करतो, पण,
तुझया आठवणी पसरल्यात
अवतीभवती माझया,
वावटळीसारख्या येतात तेव्हा
मनाची बंद कवाड मोडून पडतात.
मी तुला विसरायचा खुप प्रयत्न करतो,
समजावतो मनाला की
व्यर्थ चंद्राची आशा
व्यर्थ स्वप्नांचे पोकळ मनोरे
सत्य फक्त तो एक क्षण ज्याने
दूर केले आपल्याला कायमचे.
मी तुला विसरायचा खुप प्रयत्न करतो, पण …..
…………………………………………………
स्वामी
गोष्ट एका स्वाम्याची
आहे मोठी गमतीची.
गोष्ट आहे छान,
ऐका देऊन कान.
असा हा स्वाम्या, काय काय करतो?
सागरशी उगीच वाद घालतो
चिंतूची उगीच टेर खेचतो
ऊप्याशी निरर्थक गप्पा मारतो.
काढून वेळात वेळ
स्वाम्या कविताही करतो.
स्वाम्या तसा सिन्सिअर
बसतो प्रत्येक लेक्चर
अभ्यास त्याचा चिंध्या फार
भाराभर, पण एक ना धड.
स्वाम्या विश्वासू अनेकांच्या गोटात
अनेकांची गुपिते स्वाम्याच्या पोटात
असा हा स्वाम्या, तसा भोळाभाबडा,
मुलींकडे बघत नाही, मुलींशी बोलत नाही, मुलींभोवती घोटाळत नाही.
म्हणजे अस त्याला आवडत नाही अस नाही, पण जमत नाही.
स्वाम्याच तस आपण बर की आपल काम,
पण कशात काही नसताना, उगीच, स्वाम्या मित्रांत बदनाम!
best
मंदार अरे छान कविता लिहिल्या आहेत . मला खूप आवडली. माझे ब्लोग्स
http://manachyakavita.wordpress.com
http://mazyamana.wordpress.com
http://ravindrakoshti.blogspot.com