राधा मंगेशकर यांचा नवीन अल्बम “नाव माझं शामी” प्रकाशित झाल्याची बातमी काही महिन्यांपूर्वी वाचनात आली होती. त्यानंतर त्या अल्बमची प्रसिध्दि चॅनल्सवरुन, वर्तमानपत्रांतून वगैरे फारशी काही ऐकू आली नाही. त्यानंतर तो विषय विस्मरणातही गेला. अनेकांच्या बाबतीत हे असचं झालं असण्याची शक्यता आहे.
परवा सहज म्हणून हा अल्बम इंटरनेटवर शोधला. पहिलं गाणं ऐकल्यावर सगळाच अल्बम डाउनलोड केला.
बोरकर, सुधीर मोघे आणि महानोरांची गाणी आहेत. संगीत पंडीत ह्रदयनाथ मंगेशकरांचं आहे. पहिलं गाणं ऐकल्यावर हे खरंच वाटत नव्हत (गेले फिरायला). गोव्याच्या लोकसंगीताचा बाज असलेलं हे गाण पंडीतजींच्या आजवरच्या गाण्यांपेक्षा खूपच वेगळं आहे.
या अल्बममधला मास्टरपीस आहे “सुटलेला अंबाडा” हे गाणं. ही कविता बोरकरांचीच असली पाहिजे असा बोरकरांचा अमीट ठसा कवितेच्या शब्दांमध्ये आहे.
राधा मंगेशकरांच्या आवाजात मंगेशकरीपणा अजिबात नाही, आणि तेच त्या आवाजाचे सर्वात मोठे सामर्थ्यस्थळ आहे. कारण त्यामुळे त्यांच्या आवाजाची दीदींच्या आवाजाशी तुलना मनातल्या मनात आपण करीत नाही.
आज प्रत्येक गोष्टीचा “बझ” करुन अतिसामान्य गोष्टीही असामान्य म्हणून विकण्याचा धंदा माध्यमांमध्ये जोरात चालू आहे. त्या बॅण्डवॅगनमध्ये सहभागी होणं पंडीतजींना सहज शक्य होतं. या अल्बममधली गाणी चॅनलवरुन जोरजोरात वाजवून तो इन्स्टंट हिट करणं काही अवघड नव्हतं. पण त्यांनी ते केलं नाही यात त्यांचा मोठेपणा सामावलेला आहे.
पंडीतजींच वेगळ्या प्रकारचं संगीत आणि एक वेगळा फ्रेश, ओरिजिनल आवाज यांचा सुंदर संगम असलेला असा हा अल्बम आहे.